कोरोनाच्या विघ्नात झाला निर्विघ्न लग्न सोहळा कळंबोलीतील सुधागड हायस्कूलमध्ये पूजा शिंदे व किशोर चोरत विवाहबद्ध कन्यादानाच्या पुण्यासाठी सेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांचे सत्कार्य

पनवेल, दि.18 (वार्ताहर): कोरोना या महामारी रोगामुळे यंदा अनेकांचे जमलेले विवाह होऊ शकले नाहीत. त्यामुळे लग्नाळूंमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. मात्र कळंबोलीतील पूजा शिंदे ही युवती किशोर चोरत या युवकाशी विवाहबद्ध झाली. हे शक्य झाले ते शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्यामुळे त्यांनी सर्व कायदेशीर बाबी सोपस्कार करून देत या दांपत्याचे लग्न लावून दिले. त्यासाठी सुधागड हायस्कूलचा हॉल उपलब्ध करून दिला. सर्व परवानग्या घेण्याकरीता मदत केली. त्यामुळेच नवदांपत्य सात फेरे घेऊन एकमेकांसोबत संसार थाटण्याचा आणाभाका घेऊ शकले.

कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून मार्च महिन्यापासून लॉक डाऊन सुरू आहे. असे असतानाही कोविंड 19 चे रुग्ण संख्या वाढतच चालले आहेत. पनवेल परिसरात यामुळे काही जणांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. मुंबईपासून जवळच असलेला पनवेल परिसर रेड झोन मध्ये आहे. त्यातच अत्यावश्यक सेवा देण्याकरीता या परिसरातून अनेक जण मुंबईत जातात. त्यांना कोरोना संसर्ग होत असल्याने पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच ज्यांचे लग्न जमले आहेत. त्यांना या लग्नसराईत विवाह करता येत नाहीत. ब्रह्मचर्यातुन गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी विलंब लागत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात विवाह हा सर्वात आनंदाचा संस्कार आणि विधि असते . दोन जीवांचं यातून मिलन होते. त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होते. परंतु लग्नगाठीत जुळलेल्या दोघांच्या मिलना मध्ये व्हिलन म्हणून कोरोना हा महामारी रोग आलेला आहे. या कठीण प्रसंगात लग्न करायचे कसे असा प्रश्‍न अनेकांसमोर आहे. कळंबोली येथील हनुमंत शिंदे यांची कन्या पूजा हिचा साहेबराव चोरत यांचे चिरंजीव किशोर यांच्याशी विवाह निश्‍चित झाला होता. दोन्ही कुटुंबीयांमध्ये सोयरिक जुळली होती. परंतु लॉकडाऊन असल्याने विवाहाला अडचणी येत होत्या. वधू पक्षाच्या व्यक्तींनी ही अडचण शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या कानावर घातले. दरम्यान कन्यादानाच्या या पुण्य कार्याला सहकार्य करण्याचे संकल्प शेवाळे यांनी केला.

लागलीच पोलिसांकडून सामाजिक अंतर राखून करण्यात येणार्‍या विवाहाला मंजुरी घेण्यात आली. त्याचबरोबर वधू-वराचे मेडिकल करण्यात आले. त्यांचे सर्टिफिकेट घेतल्यानंतर शुभमंगल सावधानाचा मुहूर्त ठरला. रामदास शेवाळे यांनी सुधागड हायस्कूलचा हॉल याकामी उपलब्ध करून दिला. ठरलेल्या वेळेनुसार लग्न समारंभ पार पडला. वधू कडून सहा व वर पक्षाकडून सहा त्याचबरोबर पुरोहीत यांच्यासह शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख उपस्थित यावेळी उपस्थित होते. शेवाळे यांनी अंतरपाट धरून हा मंगलमय सोहळा पार पडण्यासाठी पुढाकार घेतला. वधू आणि वराला आहेर देवुन पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.

2 thoughts on “कोरोनाच्या विघ्नात झाला निर्विघ्न लग्न सोहळा कळंबोलीतील सुधागड हायस्कूलमध्ये पूजा शिंदे व किशोर चोरत विवाहबद्ध कन्यादानाच्या पुण्यासाठी सेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांचे सत्कार्य

 • May 19, 2020 at 12:35 am
  Permalink

  लग्नाचे धार्मिक कार्य पार पाडण्यासाठी महानगर प्रमुख रामदास शेवाळे साहेबांनी खूप मदत केली. देवाच्या आशीर्वादाने, आई व वडिलांच्या पुण्याई ने आणि रामदास शेवाळे साहेबांच्या सहकार्याने हे धार्मिक कार्य निर्विघ्नपणे पार पडले.

  पोलिस अधिकारी, रामदास शेवाळे साहेब, उपस्थित असलेली मंडळी आणि घरात राहूनच आशीर्वाद देणाऱ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार.

  धन्यवाद, ओंकार शिंदे

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *