केंद्र, राज्य सरकारने ‘एचए’ कंपनीकडून पीपीई किट, औषधे खरेदी करावीत खासदार श्रीरंग बारणे यांचे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना साकडे

पनवेल दि. 16 (वार्ताहर)- पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स कंपनी ‘एचए’ आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. ही कंपनी औषधांव्यतिरिक्त कोरोनाविरोधातील लढ्यासाठी लागणारे पीपीई किट, मास्क, इन्फ्रेड थर्मोमिटर आणि हेल्थ कोसॉकची निर्मिती करत आहे. त्यामुळे केंद्र, राज्य सरकारने ‘एचए’कडून हे वैद्यकीय साहित्य खरेदी करावे, अशी विनंती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यामुळे कंपनी आर्थिक संकटातून बाहेर येण्यास मोठी मदत होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठविले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी येथे कार्यरत असलेली ‘एचए’ कंपनी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रातील औषध उत्पादन करणारी ही एकमेव कंपनी आहे. या कंपनीने अँटी फंगन्स हेमासिन, पेनिसिलीन, एम्पीसिलीन, स्ट्रेप्टोमाइसिन आणि जेंटामाईसिन यासरखी औषधी तयार केली. ‘टीबी’च्या निर्मुलनासाठी एचएने केलेले काम कौतुकास्पद केले आहे. रक्तवाहिन्यासंबंधी पेन-वी औषधांची निर्मिती करणारी एचए एकमेव कंपनी आहे. मागील काही वर्षांपासून तोट्यात असलेली आणि आर्थिक संकटात आलेल्या ‘एचए’ कंपनीचे अस्तित्व टिकविण्यासाठी खासदार बारणे यांनी सातत्याने प्रयत्न केले. केंद्र सरकारचे रसायन मंत्रालय, अर्थमंत्रालय, पंतप्रधान कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. सरकारकडून कंपनीला आर्थिक मदत मिळवून दिली. परंतु, कंपनी आजही आर्थिक संकटाचा सामना करत आहे. भारतातील अनेक राज्यांमधील तेथील राज्य सरकार स्थानिक औषध उत्पादक कंपनीला प्राधान्य देतात. ‘एचए’ ही कंपनी महाराष्ट्रात असूनही औषध खरेदीपासून वंचित राहिली आहे. केंद्र, राज्य सरकारने एचए कंपनीला प्राधान्य द्यावे. कंपनी औषधांव्यतिरिक्त कोरोनाविरोधातील लढ्यासाठी लागणारे ‘पीपीई’ किट, मास्क, इन्फ्रेड थर्मोमिटर आणि हेल्थ कोसॉकची निर्मिती करत आहे. एकाचवेळी 23 तपासण्या होतील, अशा मशिनची निर्मिती केली आहे. त्यामुळे केंद्र, राज्य सरकारने ‘एचए’कडून हे वैद्यकीय साहित्य खरेदी करावे. यामुळे कंपनी आर्थिक संकटातून बाहेर येण्यास थोडी मदत मिळेल असे खासदार बारणे यांनी पत्रात म्हटले आहे.

कोट-

‘एचए’ कंपनीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. सरकारकडून कंपनीला मदत मिळवून दिली. त्यामुळे पुर्वपदावर येत कंपनीचे उत्पादन सुरु आहे. आर्थिक संकटातील कंपनीला मदतीची मोठी आवश्यकता आहे. कंपनीने कोरोनाविरोधातील लढण्यासाठी लागणा-या किटची निर्मिती केली आहे. एकाचवेळी 23 तपासण्या होतील, अशा मशिनची निर्मिती केली आहे. सरकारने या कंपनीकडून साहित्य खरेदी करावे. जेणेकरुन सरकारची कंपनी आर्थिक संकटातून बाहेर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *