परप्रांतीय फळ व भाजी विक्रेते बिनधास्तपणे टाकत आहेत वडघर पुलावरुन कचरा खाली
पनवेल, दि.15 (वार्ताहर) : सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय पनवेल शहर परिसरात मोक्याच्या जागा पकडून तसेच हातगाडीवर फळे व भाजी विक्रेते धंदा करीत असून तो धंदा हा चढ्या भावाने करीत आहेत. वडघर पुल व परिसरात बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे परप्रांतीय विक्रेते धंदे करीत असून त्यांच्याकडे साठणारा माल, कचरा आदी एकत्र करून ते बिनधास्तपणे वडघर पुलावरुन खाली खाडीत टाकत आहेत. त्यामुळे खाडीचे पाणीचे दुषित होत असून यातून अजून संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
अनेक प्रकारचे व्यापारी वडघर पुलाच्या दोन्ही बाजूस फळे व भाजी विक्रीसाठी आले आहेत. हे सर्व व्यापारी परप्रांतीय आहेत. येथील अनेक जण कुठे वास्तव्यास आहेत याची माहिती सुद्धा नाही. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत येणार्या अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यापार्यांवर पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अशा प्रकारची कारवाई करणे गरजेचे असतानाही कारवाई होताना दिसत नाही. परंतु त्याविरुद्ध जे जुने धंदे करणारे आहेत व स्थानिक आहेत अशांवर कारवाई मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. हा दुजाभाव का करण्यात येत आहे असा सवाल व्यापारी वर्गाकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे करंजाडे ग्रामपंचायत, वडघर परिसरातील जागृत नागरिकांनी अशा व्यापार्यांना थारा देवू नये, कुठल्याही प्रकारे नागरिकांच्या आरोग्याची काळजी न घेता उघड्या रस्त्यावर तोंडाला मास्क किंवा हातात ग्लोज न घालता ते फळ व भाजी विक्री करीत आहेत. यातून पनवेल शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने या बाबीकडे लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी पनवेलकरांकडून होत आहे.