खोटे सोने तारणातून बँकेला ३४.५६ लाखाचा गंडा.
खोटे सोने तारणातून बँकेला ३४.५६ लाखाचा गंडा
पनवेल, दि.२०(वार्ताहर) कामोठे येथील दि सह्याद्री सहकारी बँकेमध्ये ५ ग्राहकांनी १ किलो १९९ ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवत बँकेकडून एकूण ३४ लाख ५६ हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे सोन्याचे मुल्यांकन करणाऱ्या बँकेच्या अधिकृत सोनारासोबत संगनमत करुन सदर सर्वांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे कामोठे पोलिसांनी बँकेच्या मुख्य कार्यकरी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पाच ग्राहकांसह सोन्याचे मुल्यांकन करणारा सोनार तसेच बँकेचा तत्कालीन व्यवस्थापक या सर्वांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
कामोठे येथील दि सह्याद्री सहकारी बँकेमार्फत गोल्ड लोनसह विविध प्रकारची कर्ज दिले जात असून गोल्ड लोन साठी येणाऱ्या कर्जदारांच्या सोन्याचे मुल्यांकन आणि तपासणी अरविंद अमृते नामक सोनार करुन देत होता. त्यानुसार बँकेचे व्यवस्थापक ग्राहकांना सोने तारण कर्ज मंजूर करत होते. बँकेतील खातेदारक असलेली मिनाक्षी भोईटे या महिलेने २०१८ मध्ये २९९ ग्रॅम ६५० मिलीग्रॅम वजनाचे सोने तारण ठेवून बँकेकडून ९ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, सदर महिला कर्जाची रक्कम भरत नसल्याने बँकेने मनाक्षी भोईटे हिला संपर्क साधून लेखी नोटीस पाठवून कर्जाची रक्कम भरण्यास सांगितले होते. पण, तिने बँकेच्या अधिकाऱ्यांना प्रतिसाद दिला नव्हता.
त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी मिनाक्षी भोईटे हिला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली असता बँकेतील सोन्यांचे मुल्यमापन आणि तपासणी करणारा सोनार अरविंद अमृते याने सदरचे कर्ज घेतल्याचे आणि तारण सोने देखील त्याचेच असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी मिनाक्षी भोईटे हिने तारण ठेवलेल्या सोन्याचे दुसऱ्या सोनाराकडून तपासणी केली असता, ते बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर सोनार अमृते याने सोन्याचे मुल्यांकन करुन दिलेल्या इतर काही खातेदारांवर बँकेच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी अरविंद अमृते याने सोन्याचे मुल्यांकन केलेल्या आणि कर्ज भरत नसलेल्या खातेदारांची माहिती काढली.
त्यानंतर सदर ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्याची दुसऱ्या सोनाराकडून तपासणी करुन घेतली असता ते सोने देखील बनावट असल्याचे आढळून आले. अशा पध्दतीने पाच ग्राहकांनी बँकेच्या अधिकृत सोनारासोबत संगनमत करुन बँकेत १ किलो १९९ ग्रॅम ४०० मिलीग्रॅम बनावट सोने तारण ठेवून त्याबदल्यात एकूण ३ ४ लाख ५६ हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचे आढळून आल्याने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कोरडे यांनी सदर सर्वांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, मिनाक्षी भोईटे या महिलेने २९९ ग्रॅम ६५० मिलीग्रॅम बनावट सोने तारण ठेवून त्यावर बँकेकडून ९ लाख ९० हजार रुपये कर्ज घेतले आहे. शफी अजीम पटेल याने १८९ ग्रॅम ३०० मिली बनावट सोने तारण ठेवून ५ लाख १ हजार रुपये कर्ज घेतले आहे. शफी पटेल याची पत्नी शगुप्ता पटेल हिने १२३ ग्रॅम ३०० मिली बनावट सोने तारण ठेवून सव्वा तीन लाखांचे कर्ज घेतले आहे. तसेच वैभव रमाकांत गिरधर याने २५६ ग्रॅम ५५० मिली बनावट सोने तारण ठेवून ६ लाख ३८ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्याचप्रमाणे सचिन रमेश पगडे याने ३३० ग्रॅम ६०० मिली बनावट सोने तारण ठेवून १० लाख २ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे आढळून आले आहे.