महिलांनी एकमेकींना संकटात साथ द्या, तरच खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा होईल.

न्याय न मिळणाऱ्या मुलींना आत्महत्या करावी लागते या गोष्टीची लाज वाटते

बलात्काऱ्यांना पाठीशी घालणे हे राज्य सरकारचे धोरण आहे- चित्रा वाघ

महिलांनी एकमेकींना संकटात साथ द्या, तरच खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा होईल

पनवेल:
         शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीने कुचिक यांच्याविरोधात बलात्कार करून आणि जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले, असा आरोप एका तरुणीने तक्रारीत केला होता. त्यावरून कुचिक यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झाला. दोन वेळा त्यांना बेल मिळाली, परंतु कुचिक आजही त्या मुलीला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकून त्रास देत आहेत. त्या मुलीने फेसबुकवर काही वेळापूर्वी एक मेसेज केला आहे. त्यात असे लिहिले आहे की, मी आत्महत्या करीत आहे. जर त्या मुलीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याठिकाणी तिच्या आत्महत्येस पुण्याचे पोलीस आयुक्त व त्यांचे पथक, गृहमंत्री आणि संपूर्ण राज्यसरकार जबाबदार असेल, असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. त्या रविवारी (दि.१३ मार्च) संध्याकाळी कामोठे येथे भाजप युवानेते हॅप्पी सिंग व हरजिंदरकौर हॅप्पी सिंग यांनी आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
         चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, ज्या मुलींना न्याय मिळत नाही अशा मुलींना आत्महत्या करावी लागते या गोष्टीची लाज वाटते. गेल्या दोन तासापासून मी त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करतेय पण मला ती सापडत नाही जेणेकरून तिला आत्महत्येपासून परावृत्त करता येईल. परंतु बलात्काऱ्यांना पाठीशी घालणे हे राज्य सरकारचे धोरण आहे. त्या मुलीला जर बळ मिळाले असते तर तिने हे पाऊल उचलले नसते. आत्महत्येपासून परावृत्त होण्याची परमेश्वराने त्या मुलीला सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना करते, कारण आम्ही तिच्यासाठी लढतोय.
             एका ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला ही दुःखाची झालर आहे. मुली, महिला मेल्यानंतर आम्ही आंदोलन करतो, मोर्चे काढतो मेणबत्त्या लावतो; परंतु जिवंत हाडामासाची मुलगी येऊन सांगते की या नराधमाने माझ्याबरोबर दुष्कृत्य केले. परंतु त्या मुलीला न्याय मिळाला नाही. त्या मुलीची जी काही फेसबुक पोस्ट आहे ती अतिशय गंभीर आहे. आणि त्यामुळे मी अस्वस्थ आहे. मी आत्तापर्यंत गृहमंत्री, पुणे शहराचे कमिशनर, जॉइंट कमिशनर यांना व्यक्तिगत फोन कॉल्स केले. परंतु अजूनपर्यंत तिघांपैकी एकाचाही मला रिप्लाय आलेला नाही. यासोबतच व्हाट्सअपवर मेसेज देखील पाठवले आहेत, परंतु त्याचाही रिप्लाय आलेला नाही. हे सरकार आणि पोलिस यंत्रणा महिलांच्या सुरक्षिततेबाबत किती गंभीर आहे हे यावरून दिसून येत असल्याची खंतही वाघ यांनी व्यक्त केली.
        भाजप युवानेते हॅप्पी सिंग आयोजित कार्यक्रमात महिलांसाठी लक्की ड्रॉ व आकर्षक बक्षिसे तसेच खेळ खेळूया पैठणीचा याप्रकारच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, हाजी अराफत, महापौर कविता चौतमोल, भाजयुमो विक्रांत पाटील, उपमहापौर सीताताई पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक रवींद्र जोशी, नगरसेविका ऍड वृषाली वाघमारे, दर्शना भोईर, विद्या गायकवाड यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महिलांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून दोन क्षण हसण्याचे व आनंदाचे मिळावेत यासाठी भाजप युवानेते हॅप्पी सिंग व हरजिंदरकौर हॅप्पी सिंग यांच्या माध्यमातून कामोठ्यात महिलांना एक हक्काचा विरंगुळा लाभल्याची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.
        महिलांचा सत्कार आणि सन्मान करायला कोणत्याही विशिष्ट दिवसाची आवश्यकता नाही. महिलांचा वर्षभर रोजच सन्मान व्हायला हवा. महिलांनी एकमेकींना संकटात साथ द्या, तरच खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा होईल. महिलांना सक्षम आणि सशक्त बनवण्यासाठी योग्य भूमिका घेणे गरजेचे आहे आहे. जेंव्हा महिला सुरक्षित होतील तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने बळ मिळेल व त्या आणखीन पुढे जाऊ शकतील. महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा सन्मान करण्यासाठी भाजप युवानेते हॅप्पी सिंग व हरजिंदरकौर हॅप्पी सिंग यांनी आयोजित केलेला कार्यक्रम स्तुत्य आहे, असे म्हणत चित्रा वाघ यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published.