अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी त्याच त्याच योजना नाव बदलुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी त्याच त्याच योजना नाव बदलुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांच्या भांडणामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बाजुला राहिले आहेत
अन्यथा पंजाब प्रमाणे महाराष्ट्रातही जनता नवा पर्याय शोधेल
मा.राज्यमंत्री रविकांत तुपकर यांचा हल्लाबोल
पनवेल दि.13(वार्ताहर) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. परंतु शेतकऱ्यांसाठी त्याच त्याच योजना नाव बदलुन पुन्हा पुन्हा समोर येत असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. हेडलाईन मॅनेजमेंटचा हा सगळा प्रकार असुन पेपरला मोठी बातमी देऊन एवढे दिले, तेवढे दिले याबद्दल भरभरून सांगायचे. मात्र राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाचे ५ किंवा १० वर्षाचे ऑडिट केले तर केलेल्या घोषणा आणि झालेली अंमलबजावणी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे घोषणा या फक्त घोषणा राहतात. सामान्य माणसाला याचा काही फायदा होत नाही. हजारो शेतकरी महिन्याला आत्महत्या करत आहेत त्याबद्दल काहीही चर्चा नाही. सामान्य माणसाचे जगणे कसे सुखकर होईल यादृष्टीने या अर्थसंकल्पात फारशी तरतूद केलेली नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. ते पनवेल तालुक्यातील बेलपाडा येथे श्री क्षेत्र वल्डेश्वर मंदिराच्या कलशपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू, मुख्याध्यापक दत्ता कोळी, नीलम मधुकर कडू, सुजय कडू, मानव कडू यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
रविकांत तुपकर पुढे म्हणाले की, महाराषट्रातील सगळ्याच प्रस्थापित पक्षांची भांडणं पाहून सर्वसामान्य माणसाला कंटाळा आला आहे. प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांच्या भांडणामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बाजुला राहिले आहेत. शेतकरी-कष्टकरी आत्महत्या करतोय, मजुर आत्महत्या करतोय, शेतकऱ्यांची मुलं आत्महत्या करत आहेत. ग्रामीण भाग उध्वस्त झालाय. सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालं आहे. व्यापारी उद्योजक कोरोनाच्या काळात अडचणीत आहेत. या सर्व प्रश्नांवर कुठेच चर्चा होताना दिसत नाही. प्रत्येकाला फक्त सत्ता पाहिजे आहे. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता असे सगळे सुरू आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर अत्यंत खाली गेलेला आहे. महाराष्ट्राला शाहू-फुले-आंबेडकर यांची परंपरा आहे. असे असूनही प्रस्थापित पक्षांकडून घाणेरडे राजकारण होत आहे. याचा आम्हाला खेद वाटतो. या प्रस्थापित राजकीय पक्षांकडून तरुण पिढीने काय आदर्श घ्यायचा? एकाने घाणेरड्या शिव्या द्यायच्या, दुसऱ्याने चौकशी लावायची.
राजकारणाकडे बघण्याचा सर्वसामान्य माणसाचा दृष्टिकोन बदललेला आहे. खरेतर यापूर्वी सुडाचे राजकारण नव्हते. एकमेकांच्या विरोधात वैचारिक मतभेद असू शकतात. टीका करणे देखील साहजिक आहे, तेही आपण समजू शकतो. परंतु एखाद्या माणसाला राजकीय आयुष्यात उध्वस्त करायचे, त्याचा परिवार उध्वस्त करायचा. एक नवीन संस्कृती रुजू होत आहे हे अत्यंत वाईट आहे. येणाऱ्या नवीन पिढीसाठी आणि राजकारण्यांसाठी हे घातक आणि धोकादायक आहे. सर्वसामान्य माणसाने बघायचे कोणाकडे? सामान्य माणसाला आज अपेक्षा राज्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून आहेत. आणि नेते जर असे वागत असतील आणि सुडाचे राजकारण करत असतील तर सामान्य जनताही राजकारणापासून कोसो दूर राहील. त्यामुळे सुडाचे राजकारण ही प्रवृत्ती बंद करुन महाराष्ट्राच्या राजकारणाला जी एक संस्कृती परंपरा आहे त्यानुसार महाराष्ट्राचे राजकारण पूर्वपदावर यावा अशी अपेक्षा रविकांत तुपकर यांनी यावेळी व्यक्त केली.
चौकट:
अन्यथा पंजाब प्रमाणे महाराष्ट्रातही जनता नवा पर्याय शोधेल-
सगळ्या प्रस्थापित पक्षांनी चिंतन करावे. अन्यथा पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा लोकांनी पर्याय म्हणुन स्वीकार केला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनता सगळ्या प्रस्थापित पक्षांना बाजुला ठेवून नवा पर्याय शोधतील आणि स्वीकारतील. त्यामुळे प्रस्थापितांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे, असे मत देखील तुपकर यांनी व्यक्त केले.
चौकट:
भविष्यात महाराष्ट्राला एक नवा पर्याय द्यायचा प्रयत्न-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सगळ्या पक्षाचा अनुभव आलेला आहे. आमचे हात पोळुन निघालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या पक्षांपासून समान अंतरावर राहायचं, असा विचार करीत आहोत. आणि भविष्यात महाराष्ट्राला एक नवा पर्याय द्यायचा प्रयत्न राहील. लोकांच्या मनामध्ये प्रस्थापित पक्षांबद्दल राग तयार होत आहे. लोक चांगल्या पक्षाच्या शोधत आहेत. असा एखादा सक्षम पर्याय महाराष्ट्राच्या राजकारणात देता येतो का या दृष्टीने आमच्या चर्चा सुरू असल्याचे तुपकर म्हणाले.