पनवेल महानगरपालिकेमार्फत मनपा हद्दीत विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा ठराव पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर.
पनवेल महानगरपालिकेमार्फत मनपा हद्दीत विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा ठराव पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरपनवेल : पनवेल महानगरपालिकेमार्फत मनपा हद्दीत विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा ठराव पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे पालिका हद्दीत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे, त्यांच्या मागणीला यश आले आहे. पनवेल महानगरपालिकेमार्फत सद्यस्थितीत ११ शाळा चालविण्यात येत आहेत. यापैकी ८ मराठी माध्यमाच्या शाळा, २ उर्दू व १ गुजराती शाळा आहेत. मात्र अद्याप पनवेल महानगरपालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा नाही. मनपाच्या सद्यस्थितीत इ.१ ते इ.७ पर्यंतच्या शाळा आहेत. पालिका हद्दीत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली होती. इंग्रजी माध्यमाची होणारी शाळा पूर्व प्राथमिक ते इ.१० पर्यंतच्या वर्गासाठी सुरू केली जाणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या ऑनलाईन सभेत पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाचे अभिनंदन करत मराठी माध्यमांच्या शाळेचा विसर पडू नये म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी एका विशेष सभेची मागणी केली. पालिकेच्या मराठी शाळेची पट्संख्या घसरत चाललेली आहे. या विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणसाठी प्रयत्न करायला हवेत. प्रयोगशाळा, संगणक, संगीत शिक्षक, ग्रंथालय क्रीडा शिक्षक अशा सुविधांचा शाळेत अभाव आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी खासगी शाळेच्या तुलनेत विद्यार्थी मागे पडतात. त्यांचा शैक्षणिक स्तर ऊंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबविल्या पाहिजेत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा कसा ऊंचावेल याकडे पहायला हवे. असे मत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केले.