पनवेल तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेणार,काँग्रेस तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी.

पनवेल तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेणार ः काँग्रेस तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी
पनवेल, दि.14 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझ्यावर जी तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे त्याला मी प्रामाणिकपणे न्याय देणार असून आगामी काळात काँग्रेस हा पक्ष एक वेगळी ताकद म्हणून उभारणीस आलेला दिसून येईल, असे मत नवनिर्वाचित काँग्रेस पनवेल तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी व्यक्त केले.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, युवा नेतृत्व राहूल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष हा देशभरात काम करत आहे. गोरगरीबांचे प्रश्‍न सोडविणे हाच आमचा मुख्य उद्देश असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. आगामी काळात गाव तेथे काँग्रेस ही संकल्पना राबविणार असून गोरगरीबांचे प्रश्‍न कशा तर्‍हेने सोडविण्यात येतील याकडे लक्ष देणार आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसची ताकद पनवेल तालुक्यात कशी वाढेल या दृष्टीने आगामी काळात बैठका घेवून त्याचे नियोजन करणार आहे. नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो काँग्रेस विरुद्ध जे भाष्य केले आहे त्याचा आम्ही निषेध करीत असून याउलट महाविकास आघाडीने महाराष्ट्रात जे काम केले आहे ते इतर राज्याला सुद्धा जमले नाही आहे. त्यामुळेच कोरोना लवकरच आटोक्यात आला आहे. याचा कोणाला विसर पडू नये. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा पूर्ण ताकदीनिशी काँग्रेस पक्ष हा उतणार आहे व ज्याप्रमाणे पक्ष श्रेष्ठी आदेश देतील तशी निवडणूक लढविणार असल्याचे नंदराज मुंगाजी यांनी सांगितले आहे. पक्ष वाढीसाठी सदस्य नोंदणी अभियान सुरू असून आज मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेस पक्षाकडे आकर्षित झाले आहेत. तरी त्यांनी अधिकृत सदस्य नोंदणी करून घ्यावी असे आवाहन सुद्धा तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.