व्यावसायिकाची फसवणूक करणार्‍या महिलेविरुध्द गुन्हा दाखल.

व्यावसायिकाची फसवणूक करणार्‍या महिलेविरुध्द गुन्हा
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेने खारघर मधील एका व्यावसायिकाकडून दोन लाख रुपये उकळून त्यांना त्यांचे पैसे परत न देता त्यांना धमकावल्याचा प्रकार घडला आहे. प्रियंका (सिमा) काळेल असे या महिलेचे नाव असून तिने अजित पवार चुलत सासरे असल्याचे आणि डायरेक्टर पितांबर काळेल तिचे सासरे असल्याची देखील थाप मारल्याचे उघडकीस आले आहे. सदर महिलेविरोधात खारघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, सदर महिलेने अशाच पध्दतीने अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रकरणातील तक्रारदार श्रीकृष्ण गोसावी पुण्यात राहण्यास असून त्यांचा प्रॉपर्टी कन्सलटन्सी आणि शेअर मार्केटींगचा व्यवसाय आहे. डिसेंबर 2020 मध्ये त्यांची प्रियंका काळेल हिच्यासोबत खारघरमधील लॅन्डमार्क बिल्डींगमध्ये ओळख झाली होती. त्यावेळी प्रियंकाने ती फिल्म प्रॉडक्शनचे काम करत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी गोसावी यांनी त्यांच्या 13 वर्षीय मुलीला चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर प्रियंका काळेल हिने रणझुंज नावाचा मराठी सिनेमा बनवत असून या सिनेमांमध्ये वया प्रमाणे 6, 12 आणि 18 वर्षे असे रोल असल्याचे गोसावी यांना सांगितले होते. तसेच सदर सिनेमामध्ये सलमान खान प्रमुख पाहुणा कलाकार म्हणून काम करणार असल्याचे सांगून त्यांच्या मुलीला या सिनेमात काम करण्याची संधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच त्यांच्या मुलीचे फोटोग्राफ आणि व्हिडीओ पाठवून देण्यास सांगिलते होते. त्यावेळी प्रियंका हिने अजित पवार तिचे मावस सासरे तर डायरेक्टर पितांबर काळेल तिचे सासरे असल्याचे सांगून गोसावी यांच्यावर छाप पाडली होती. काही दिवसानंतर प्रियंका काळेल हिने गोसावी याना फोन करुन तिला एडिटींगचे मशिन्स घेण्यासाठी पाच लाख रुपये कमी पडत असल्याचे सांगून गोसावी यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. आपल्या मुलीला सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळत असल्याने गोसावी यांनी प्रियांकाला दोन लाख रुपये दिले होते. सदर रक्कम 10 दिवसात परत करण्याचे आश्‍वासन प्रियंकाने गोसावी यांना दिले होते. त्यामुळे गोसावी यांनी 10 दिवसानंतर प्रियंकाला फोन करुन आपल्या पैशांची मागणी केली असता, तिने वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर प्रियंकाने जाणीवपूर्वक खाडाखोड करुन दोन लाख रुपयांचा चेक गोसावी यांना दिला. यानंतर सदर चेक त्यांनी बँकेत टाकला असता प्रियंकाच्या खात्यात पैसे नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर गोसावी यांनी प्रियंका हिची माहिती काढली असता ती फसवणूक करत असल्याचा संशय त्यांना आला. त्यामुळे गोसावी यांनी डायरेक्टर पितांबर काळेल यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पितांबर काळे तिचे सासरे नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर प्रियंका काळेल हिने गोसावी यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्याशी गोड बोलून त्यांना ब्लॅकमेल करुन फसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोसावी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर देखील गोसावी यांनी प्रियंकाकडे पैशाची मागणी केल्याने तीने टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच त्यांचे सर्व रेकॉर्ड तिच्याकडे असल्याचे सांगून त्यांना ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली. त्यानंतर गोसावी यांनी प्रियंका विरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published.