गोल्फ कोर्स’च्या कामासाठी टेकडीवर विना परवानगी खोदकाम पनवेल प्रांत विभागाकडून 4 जेसीबी, 2 डंपर जप्त.

गोल्फ कोर्स’च्या कामासाठी टेकडीवर विना परवानगी खोदकाम
पनवेल प्रांत विभागाकडून 4 जेसीबी, 2 डंपर जप्त
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः खारघर मधील ‘गोल्फ कोर्स’च्या धामोळे पाड्यालगत असलेल्या नैसर्गिक टेकडीवर खोदकाम करताना परवानगी न घेता खोदकाम करीत असल्याने पनवेल महसूल विभागाने कारवाई करुन 4 डंपर आणि 2 जेसीबी सील केल्याने पर्यावरण प्रेमी समाधान व्यक्त करीत आहेत.
‘सिडको’ने खारघर सेक्टर-23 आणि 24 मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोल्फ कोर्ससाठी 18 होलची रचना केली होती. मात्र, यातील काही जमीन वनविभागाची असल्यामुळे ‘सिडको’ने 11 होलचे गोल्फ कोर्स उभारले आहे. गोल्फ कोर्सलगत ‘सिडको’ची काही जमीन राखीव आहे. सदर जमिनीवर सिडकोकडून उर्वरित 9 ‘गोल्फ कोर्स’च्या कामाला दोन दिवसापासून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, ‘गोल्फ कोर्स’च्या कामासाठी टेकडीवर जेसीबी लावून खोदकाम करुन जमिन सपाटीकरणाचे काम केले जात असल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. दरम्यान, पर्यावरण प्रेमी ‘नेटकनेक्ट फाउंडेशन’चे संचालक बी. एन. कुमार यांनी पनवेल प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. सदर तक्रारीची दखल घेवून कळंबोली सर्कल अधिकारी संतोष कचरे यांच्या पथकाने पाहणी केली असता, खोदकाम करताना कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास येताच 2 जेसीबी आणि 4 डंपर सील केल्याने ठेकेदाराचे धाबे दणाणले आहे. उर्वरित ‘गोल्फ कोर्स’च्या कामासाठी टेकडीवर जेसीबी लावल्यामुळे भविष्यात बाजूलाच असलेल्या धामोळे पाड्यातील रहिवाशांना धोका होवू शकतो. सदर विषय घेवून धामोळे पाड्यातील काही ग्रामस्थांनी टेकडीच्या खोदकामाला विरोध केला. मात्र, ग्रामस्थांचा विरोध झुगारुन ‘सिडको’ने खोदकाम केले, असे धामोळे पाड्यातील ग्रामस्थांनी सांगितले. खोदकाम करताना काही झाडांची अडचण येत असल्यास इतर ठिकाणी पुन्हा रोपण करता येते. मात्र, निसर्गाने दिलेली टेकडी निर्माण होण्यासाठी लाखो वर्षे लागतात, याचा विचार सिडको प्रशासनाने करणे आवश्यक आहे. तसेच वन परिसर लगत असलेल्या टेकडीवर खोदकाम करताना पर्यावरण विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, सदर जमीन ‘सिडको’ची असल्यामुळे ‘सिडको’ने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
कोट
पनवेल प्रांत अधिकार्‍याच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे. टेकडीवर किती प्रमाणात खोदकाम करण्यात आले, याची मोजणी केल्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. – संतोष कचरे, सर्कल अधिकारी – कळंबोली.

Leave a Reply

Your email address will not be published.