रिक्षातुन आलेल्या दोघा लुटारुंनी लुटली 10 लाखाची रक्कम.

रिक्षातुन आलेल्या दोघा लुटारुंनी लुटली 10 लाखाची रक्कम  
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः रिक्षामधुन आलेल्या दोघा लुटारुंनी एका व्यावसायीकाच्या हातातील 10 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी लुटून पलायन केल्याची घटना सीबीडी सेक्टर-3 परिसरात नुकतीच घडली आहे. सीबीडी पोलिसांनी या घटनेतील दोघा लुटारुविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  
या घटनेतील तक्रारदार बजरंग म्हात्रे हा व्यावसायीक पनवेलमधील वलप गावात राहण्यास असुन त्याचा जुन्या गाडया खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. बजरंगचा व्यावसायीक मित्र निखील उसाटकर याला गाडी खरेदी विक्री व खाजगी कामासाठी 10 लाख रुपयांची गरज असल्याने त्याने बजरंगकडे सदर रक्कमेची मागणी केली होती. त्यामुळे बजरंगने आपल्याजवळचे 4 लाख रुपये व बँकेतून काढलेले 6 लाख रुपये अशी जमवाजमव केलेली 10 लाख रुपयांची रक्कम घेऊन सीबीडी सेक्टर-3 मधील पवन हॉटेल समोर उभा होता. यावेळी बजरंग रोख रक्कम असलेली पिशवी निखील याला देत असताना त्यांच्या पाठीमागून रिक्षामधुन आलेल्या दोघा लुटारुपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारुने बजरंगच्या हातात असलेली रोख रक्कमेची पिशवी हिसकावून रिक्षामधून हायवेच्या दिशेने पलायन केले. यावेळी बजरंग आणि निखील या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र सदर रिक्षा त्यांच्या हाती लागली नाही. या प्रकारानंतर घाबरलेल्या बजरंग याची प्रकृती बिघडल्याने त्याने दवाखान्यात उपचार करुन सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published.