2.10 कोटींची एमडी पावडर जप्त; दुक्कल जेरबंद.

2.10 कोटींची एमडी पावडर जप्त; दुक्कल जेरबंद
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः एमडी (मेथ्यॉक्युलॉन पावडर) नामक अंमली पदार्थ विकण्यासाठी खारघर येथील लिटील वर्ल्ड मॉल जवळ आलेल्या समद नसीबखान शेख (26) आणि प्रशांत दत्तात्रय वराट (23) या दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 10 लाख रुपये किंमतीचे 2 किलो 100 ग्रॅम वजनाचे एमडी पदार्थ जप्त केले आहे. या दोघांनी सदरचे अंमली पदार्थ कुठून आणले आणि ते कुणाला विक्री करणार होते? याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.
दोन व्यक्ती खारघर मधील लिटील वर्ल्ड मॉल समोरील पार्किंग जवळ एमडी पावडरची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-3 ला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथकाने सापळा लावला होता. यावेळी समद शेख आणि प्रशांत वराट दोघेही लिटील वर्ल्ड मॉल जवळच्या पार्किंगमध्ये संशयास्पदरित्या आले असता, गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांची धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनी समद शेख याच्या जवळ असलेल्या सॅग बॅगेची तपासणी केली असता त्यात 1 किलो 450 ग्रॅम वजनाचे एमडी पदार्थ आढळून आले. तसेच प्रशांत वराट याच्याकडे असलेल्या प्लास्टीक पिशवीत 650 ग्रॅम वजनाचे एमडी पदार्थ आढळून आले. त्यामुळे गुन्हे शाखेने या दोघांकडे सापडलेली तब्बल 2 कोटी 10 लाख रुपये किंमतीची एमडी पावडर जप्त करुन दोघांकडे या पावडर बाबत अधिक चौकशी केली. त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गुन्हे शाखेने या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published.