हॉकीस्टिक व फावड्याच्या दांड्याने बिल्डरने शेतकऱ्याला केली बेदम मारहाण.

हॉकीस्टिक व फावड्याच्या दांड्याने बिल्डरने शेतकऱ्याला केली बेदम मारहाण

बिल्डर मनोजकुमार सिंग व बॉडिगार्ड्सविरुद्ध गुन्हा दाखल

बिल्डर मनोजकुमार सिंगला भाईगिरी आली अंगाशी

पनवेल:
मे.अमन डेव्हलपर्स मार्फत मालक मनोजकुमार सिंग या बिल्डरच्या बॉडिगार्ड्सने शेतकरी उद्देश टेंबे यांना जबरदस्तीने गाडीत टाकून अपहरण करून ऑफिसला नेऊन हॉकी स्टिक व फावड्याच्या दांड्याने जबरदस्त मारहाण केल्याची घटना घडली. सदर डेव्हलपर हा बिल्डींगचे काम लवकरात लवकर पूर्ण करीत नाही, व करारामध्ये ठरल्याप्रमाणे बांधकाम पूर्ण न केल्यास द्यायचे भाडे सुद्धा देत नाही याबाबत सतत विचारणा करण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी गेल्याचा राग मनात धरून बिल्डर व त्याच्या बॉडिगार्ड्सने जबरदस्तीने गाडीत भरून ऑफिसला नेऊन बेदम मारहाण केल्याचे फिर्यादी उद्देश टेंबे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून बिल्डर मनोजकुमार सिंग याने माझ्या सासऱ्यांसह अनेक गरीब शेतकऱ्यांना फसविले असून त्याची कसून चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व आम्हा गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी उद्देश टेंबे यांनी केली आहे.
सदर घटनेबाबत फिर्यादी उद्देश टेंबे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुढे सांगितले की, माझे सासरे काशीराम शंकर ठोकळ यांचा उलवे येथील से.१६, प्लॉट नं. ए ३५, क्षेत्र १५० चौ.मी. असणारा भूखंड मे.अमन डेव्हलपर्स मार्फत मालक मनोजकुमार सिंग यांना बांधकामास दिला आहे. सदर व्यवहारात माझ्या पत्नीचा हिस्सा असून व्यवहाराची पॉवर ऑफ ऍटोर्नी माझ्याकडे दिली आहे. सदर बांधकाम बिल्डरने करारात ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण न केल्याने व ठरलेल्या अटीशर्तीप्रमाणे न केल्याने त्याच्या ऑफिसला फ्लॅटच्या ताब्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो असता त्याचे ऑफिस बंद होते. तर अनेकदा फोन केले असता त्याने फोनही उचलले नाहीत. त्यामुळे बिल्डर मनोजकुमार सिंग याने आमची फसवणूक केल्याने त्याच्याविरुद्ध ‘रेरा’मध्ये तक्रार केली. त्याचा राग मनात धरून बिल्डरने पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध खोट्या व खोडसाळ दाखल करून मला व माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न केला.
उद्देश टेंबे यांनी पुढे बोलताना सांगितले की, मी पनवेलमधील मोठा खांदा येथे राहत असून रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो. नेहमीप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी काम कुठपर्यंत आले आहे याची पाहणी करण्यासाठी गेलो असता बिल्डिंगसमोर रिक्षा थांबवली व रिक्षातून उतरून बिल्डींगचे मोबाईलच्या कॅमेरॅत फोटो काढत असल्याचे सुपरवायझर आकाश याने पाहून बिल्डरला कळवले. त्यानंतर बिल्डर मनोजकुमार वापरत असलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ त्याठिकाणी आली व गाडीतून इतरलेल्या ७-८ इसमांनी हॉकी स्टिक, फावड्याचा दांडा व लाथा बुक्क्याने शरीरावर ठिकठिकाणी मला बेदम मारहाण केली. तसेच माझ्या मनाविरुद्ध जबरदस्तीने उचलून गाडीत टाकले व सिवूड येथे बिल्डरच्या ऑफिसला नेऊन केबिनचा दरवाजा बंद करून बिल्डर मनोजकुमार सिंग व त्याच्या बॉडिगार्ड्सने पुन्हा एकदा हॉकी स्टिक व फावड्याच्या दांड्याने मला बेदम मारहाण केली. तसेच मी मोबाईलमध्ये साईटचे काढलेले फोटो डिलीट करायला लावले व दमदाटी करून २१ उठाबशा मारण्यास भाग पाडले. बिल्डरसोबत असलेल्या गनमॅनला बिल्डरने सांगितले की, ‘ये अगर उलवे की साईटपर दिखा तो इसे गोलीसे जानसे मार डालो’ अशी धमकी दिली. त्यानंतर सायंकाळी ६:२५ वाजण्याच्या सुमारास मला ऑफिसमधून हाकलून दिले. त्यानंतर माझे मित्र व नातेवाईकांना सदर घटनेची माहिती दिली व न्हावाशेवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर प्रकाराबाबत अमन डेव्हलपर्सचे मालक मनोजकुमार सिंग यांच्यावर कठोर कारवाई करून माझ्यासारख्या फसवणूक झालेल्या अनेक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी उद्देश टेंबे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.