भोजनालयातील सिलेंडरचा स्फोट होवून लागली आग ; बाजूच्या दोन घरांचे मोठे नुकसान..

भोजनालयातील सिलेंडरचा स्फोट होवून लागली आग ; बाजूच्या दोन घरांचे मोठे नुकसान
पनवेल, दि.1 (संजय कदम) ः कामोठे वसाहतीमधील एका भोजनालयात असलेल्या सिलेंडरचे स्फोट होवून लागलेल्या आगीत त्या भोजनालयासह बाजूला असलेल्या दोन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
कामोठे वसाहतीमधील सेक्टर 11 येथे असलेल्या स्वस्तिक प्लाझा या इमारतीमध्ये जयंतीलाल यांचे भवानी भोजनालय आहे. सदर ठिकाणी आज सायंकाळी 7 च्या दरम्यान सिलेंडरचे स्फोट झाले व त्या स्फोटामध्ये बाजूच्या घरांना सुद्धा आग लागून त्यांचे मोठे नुकसान झाले. स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूचे सर्व रहिवाशी घराबाहेर पडल्यामुळे कुठलीही जिवीतहानी झाली नाही. साधारण 4 सिलेंडरचे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस ठाण्याचे पथक तसेच पनवेल अग्नीशमन दलाचे बंब व कळंबोली अग्नीशमन दलाचे बंब असे 4 ते 5 बंब घटनास्थळी पोहचून त्यांनी अवघ्या 15 ते 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविल्याने आग पसरली नाही. सायंकाळची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणात या भागात रहदारी असते. त्यामुळे आग पसरली असती तर मोठी जिवीतहानी झाली असती असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
कोट
कामोठे वसाहतीमधील लोकसंख्या वाढत चालली आहे. त्याचप्रमाणात आगीचे प्रकार सुद्धा वाढत चालले आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने व सिडकोने आरक्षित करून ठेवलेल्या भूखंडावर अग्नीशमन केंद्र उभारावे तसेच या ठिकाणी कायमस्वरुपी अग्नीशमन बंब उपलब्ध करून द्यावा ः रवींद्र जोशी, भाजपा कामोठे शहराध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published.