पनवेलमधील कोरोना रुग्णांची माहिती हवीच! -विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे आयुक्तांना पत्र

पनवेलमधील कोरोना रुग्णांची माहिती हवीच! -विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे आयुक्तांना पत्र

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने शिरकाव केला आहे. दररोज रुग्णसंख्येत किमान एक हजाराने भर पडत आहे. सध्याच्या घडीला सुमारे सहा हजार सक्रिय रुग्ण असताना पालिकेच्या माध्यमातून दैनंदिन अहवालातून रुग्णांची संक्षिप्त माहिती हटविण्यात आल्याने विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी थेट पालिका आयुक्तांना याबाबत पत्र लिहून दैनंदिन अहवालात रुग्णांची संक्षिप्त माहिती देण्याची मागणी केली आहे.

              कोविड रुग्ण तसेच विलगीकरणात राहणाऱ्या नागरिकांना शासनाने नियमावली तयार केली आहे. या नियमांचे सर्वत्र पालन होते असे नाही. अशा परिस्थितीत आपल्या शेजारी अथवा आपल्या परिसरातील ईमारतीमध्ये किती रुग्ण संख्या आहे, याबाबत प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. यापूर्वी पालिकेमार्फत दैनंदिन कोरोना अहवालात पालिका क्षेत्रातील रुग्णांसह,  त्यांचा पत्ता, शहर, ईमारतीची माहिती दिली जात होती. रुग्ण संख्या वाढत असल्याने मागील काही दिवसांपासून पालिकेने रुग्णांची संक्षिप्त माहिती देणे बंद केले आहे. यामुळे नागरिक गोंधळात आहेत. आपल्या शेजारील रुग्णांची माहिती आपणास मिळाल्यास अशा ठिकाणी संपर्क टाळण्यात येऊन संबंधित नागरिकांना सोपे होईल. बहुतांशी रहिवासी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपली माहिती दडविण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातच पालिकेने अशा रुग्णांची माहिती देणेच बंद केल्याने यामुळे कोरोनाची साथ आणखी पसरण्याची भीती विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पुढाकार घेऊन पुन्हा कोरोना रुग्णांची संक्षिप्त माहिती पालिकेच्या दैनंदिन कोविड अहवालात समाविष्ट करावी, अशी मागणी प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *