खारघर येथील ‘श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल’च्या छतावर इंडसइंड बँकेने बसविले सोलर पॅनेल.

खारघर येथील ‘श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल’च्या
छतावर इंडसइंड बँकेने बसविले सोलर पॅनेल

पनवेल (प्रतिनिधी) खारघर येथील ‘श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल’च्या छतावर आज(दि.०३ सप्टेंबर) इंडसइंड बँकेने सोलर पॅनेल बसविले. ही एक ‘लार्ज स्केल ग्रिड सोलर फोटोव्होल्टिक सिस्टीम’ असून ती सुमारे ३०० किलोवॅट पीक (केडब्ल्यूपी) इतकी वीज निर्मिती करील. त्यामुळे कार्बन उत्सर्जन ३४० मेट्रिक टनांनी कमी होईल. शिवाय, यामुळे रुग्णालयाच्या वीजवापराच्या खर्चात वर्षाकाठी सुमारे ६० लाख रुपयांची बचत होणार असून ही बचत रक्कम जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त ४० मुलांच्या हृदयावरील विनामूल्य शस्त्रक्रियांसाठी वापरली जाणार आहे.
‘श्री सत्य साई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्ट’चे अध्यक्ष सी. श्रीनिवास आणि ‘इंडसइंड बँके’च्या कॉर्पोरेट व इन्व्हेस्टमेंट बँकिंग, सीएसआर व सस्टेनेबल बँकिंग या विभागांच्या प्रमुख रूपा सतीश यांच्या हस्ते पॅनेल बसविण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बॅंकेचे व ट्रस्टचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे या रुग्णालयाच्या विश्वस्तांपैकी एक असल्याने, ते ‘व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म’च्या माध्यमातून उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल बोलताना ‘इंडसइंड बँके’च्या कॉर्पोरेट व इन्व्हेस्टमेंट बँकिंग, सीएसआर व सस्टेनेबल बँकिंग या विभागांच्या प्रमुख रूपा सतीश म्हणाल्या, “आमचे प्रभावक्षेत्र आर्थिक परिसंस्थेच्या पलिकडे आहे, असे आम्ही इंडसइंड बॅंकेत मानतो. एक संस्था म्हणून आम्ही अर्थव्यवस्था, समाज आणि पर्यावरणाच्या उन्नतीसाठी समप्रमाणात कटिबद्ध आहोत. ‘श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल’मध्ये सोलर पॅनेल आम्ही बसविले, यातून आमची ही कटिबद्धता दिसून येते. या उपक्रमामुळे, कार्बन उत्सर्जन कमी करण्यामध्ये आमची रुग्णालयाला मदत होत आहेच; त्याशिवाय हृदयविकार असलेल्या मुलांवर शस्त्रक्रिया करण्यातही आमचा हातभार लागत आहे. अशा उदात्त कारणांसाठी योगदान देणे आणि स्वतःहून त्यात भागीदार होणे हा बँकेने नेहमीच आपला सन्मान मानला आहे, आणि भविष्यातही बॅंक असेच करत राहील.
सोलर पॅनेल बसविण्याचे काम हा इंडसइंड बँकेच्या ‘इन्स्टिट्यूशन्स ऑन सोलर’ या सीएसआर उपक्रमाचा एक भाग आहे. ‘सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड एज्युकेशन’ (सीईआरई) ही संस्था या कामामध्ये अंमलबजावणीचे काम करते. या उपक्रमांतर्गत बँकेने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये १४ शाळा, संस्थांमध्ये ‘रूफ टॉप सोलर इन्स्टॉलेशन’ यशस्वीरित्या पूर्ण केले. ही पॅनेल्स बसविल्यामुळे २५ वर्षांच्या कालावधीत ६९ लाख युनिट सौर ऊर्जा निर्माण होईल, असा अंदाज आहे, परिणामी सहा कोटी रुपयांची वार्षिक बचत होईल आणि एकूण ५६०० मेट्रिक टन इतके कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *