२७ गाव प्रकल्पबाधित कृती समितिचा सिडकोविरोधात एल्गार..

२७ गाव प्रकल्पबाधित कृती समितिचा सिडकोविरोधात एल्गार; १३ जानेवारीला ‘भूमीपुत्र निर्धार परिषद’पनवेल, दि.2 (वार्ताहर)- सिडकोने विमानतळाची कामे जलद गतीने सुरू केली परंतु नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांचे नाव देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसह सदर संपादीत जमिनीचे नुकसानभरपाई संदर्भातील प्रश्न, पुनर्वसन व पुनर्वसाहत प्रक्रीयेमध्ये निर्माण झालेले प्रश्न तसेच विमानतळ भरावामुळे डुंगी, पारगाव, खालचे ओवळे, दापोली व भंगारपाडा या गावात पाणी साचत असल्याने त्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, असे महत्वाचे व इतर प्रश्न सिडकोने अद्यापपर्यंत सोडविलेले नाहीत. त्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या इतरही अनेक प्रलंबित मागण्या सिडकोकडे प्रस्तावित आहेत, अशी माहिती पनवेल तालुक्यातील पुष्पकनगर येथील गणेश मंदिरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यामुळे सिडको विरोधात एल्गार करीत येत्या 13 जानेवारीला भूमीपूत्र निर्धार परिषद आयोजित केल्याची माहिती देण्यात आली.
           सिडकोने कामे अगदी जोमाने सुरू केली असली तरीही प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात सिडको टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नाईलाजास्तव आंदोलन करणे भाग पडत आहे. आंदोलनाचा पहीला टप्पा सिडकोच्या या अत्याराचाराच्या निषेधार्थ येत्या १३ जानेवारीला लोकनेते दि.बा. पाटील सर्वपक्षीय कृती समितीच्या अध्यक्षतेखाली भूमीपुत्र निर्धार परिषद तसेच दुसरा टप्पा सिडकोचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक २४ जानेवारीला नवी मुंबई विमानतळात सुरू असलेली कामे बंद करण्याचे ठरविलेले आहे. त्यानंतर, परीस्थीतीनुसार पुढील आंदोलनाबाबत विचार करण्यात येईल अशी माहिती आज (रविवार दि.२जानेवारी) लोकनेते दि बा. पाटील २७ गाव प्रकल्पबाधित कृती समितिच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी सिडको प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात लोकनेते दि.बा. पाटील २७ गाव प्रकल्पबाधित कृती समितिच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला. यावेळी २७ गाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा “सार्वजनिक खाजगी भागीदारी” मध्ये बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर चिंचपाडा, कोपर, उलवे, तरघर, कोंबडभुजे, वाघिवली वाडा, वाघीवली, वरचे ओवळे, खालचे ओवळे, कोल्ही, पारगाव, दापोली, डुंगी या गावाच्या घरांच्या व शेतांच्या जमिनीवर उभारण्याचे काम सुरू आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये अदानी ग्रुप कंपनीचे ७४ टक्के, एअरपोर्ट ऑथोरीटी ऑफ इंडीयाचे १३ टक्के व सिडकोचे १३ टक्के समभाग आहेत. या विमानतळ प्रकल्प उभारणीत सिडको ही नोडल एजन्सी असून विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे काम सिडकोच्या अखत्यारीत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प राष्ट्रीय हिताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळेच महाराष्ट्र शासन निर्णय महसूल व वन विभाग क. एस–३०/प्र.क. ३५/र १ दिनांक १४/०९/२००४ व आरपीए २००६/१(६)/र १ दिनांक १७/०३/२००६ नुसार “आधी पुनर्वसन मग प्रकल्प” हे शासनाचे धोरण असतानादेखील, विमानतळ उभारणी व पुनर्वसन हे समांतररीत्या करावयाच्या सिडको प्रशासनाच्या आवाहनाला प्रकल्पग्रस्तांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सहकार्य करून प्रकल्प उभारणीस सुरूवात केली. सिडकोने विमानतळाची कामे जलद गतीने सुरू करून घरांचे व पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित असताना काही प्रकल्पग्रस्तांची घरे जबरदस्तीने जमीनदोस्त केली तसेच ज्यांनी स्वतःची घरे मोडून पुनर्वसन क्षेत्रात घरे बांधण्याकरीता सुरूवात केली असता सिडको पुनर्वसन क्षेत्रामध्ये सोयी सुविधा पुरविण्यास सिडको असमर्थता दर्शवित असून प्रकल्पग्रस्तांचे घरे बांधकाम प्रक्रियेत सिडको अडचणी निर्माण करीत आहेत. विशेष म्हणजे जोपर्यत घरे खाली होत नव्हती तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास रस असलेले सिडको प्रशासन आता घरे खाली केल्यानंतर प्रश्न सोडविण्यास नकारात्मकता दर्शवित आहे. यावेळी २७ गाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, कार्याध्यक्ष सुनील म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, खजिनदार संतोष पवार, उपाध्यक्ष गोवर्धन डाऊर, सी टी पाटील, करण भोईर, ऍड.प्रशांत भोईर, सचिव प्रेम पाटील, सहसचिव किरण केणी, चेतन डाऊर, सह खजिनदार कैलास तारेकर, कायदेशीर सल्लागार ऍड राहुल मोकल, ऍड.प्रदीप मुंडकर, सल्लागार पुंडलिक म्हात्रे, जयवंत परदेशी, गजानन पाटील, विष्णू जितेकर, प्रवक्ते रुपेश धुमाळ, संपर्कप्रमुख किरण पवार, माहिती प्रसारण सुनील कटेकर, उमेश खांदेकर, आरटीआय सेल सचिन कांबळे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
              फोटोः सिडको विरोधात एल्गार संदर्भात माहिती देताना २७ गाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, कार्याध्यक्ष सुनील म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, खजिनदार संतोष पवार, उपाध्यक्ष गोवर्धन डाऊर, सी टी पाटील, करण भोईर, ऍड.प्रशांत भोईर, सचिव प्रेम पाटील, सहसचिव किरण केणी, चेतन डाऊर, सह खजिनदार कैलास तारेकर, कायदेशीर सल्लागार ऍड राहुल मोकल, ऍड.प्रदीप मुंडकर, सल्लागार पुंडलिक म्हात्रे, जयवंत परदेशी, गजानन पाटील, विष्णू जितेकर, प्रवक्ते रुपेश धुमाळ, संपर्कप्रमुख किरण पवार, माहिती प्रसारण सुनील कटेकर, उमेश खांदेकर, आरटीआय सेल सचिन कांबळे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *