19 लाखाची रोकड लुटून पसार झालेल्या 6 लुटारुंना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केले गजाआड

19 लाखाची रोकड लुटून पसार झालेल्या 6 लुटारुंना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केले गजाआड
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः कामोठे बस स्टॉपजवळ थांबलेल्या एका खाजगी बसमधून उतरलेल्या सोन्या चांदीच्या व्यापार्‍याच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून त्याला धारदार शस्त्राने वापर करून त्याच्या जवळ असलेली 19 लाख रुपयाची रोकड असलेली बॅग घेवून पसार झालेल्या 6 लुटारुंना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने अवघ्या 72 तासात गजाआड केले आहे.
या संदर्भात व्यापारी संतोष जाधव (38) यांनी सदर गुन्ह्याची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात होताच तात्काळ अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) . महेश घुर्ये, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा . सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे पोलीस ठाण्याचे पथक व गुन्हे शाखा 2 पनवेलचे पथक यांनी घटनास्थळी भेट देवून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून तपासाला सुरूवात केली. गुन्हे शाखा, कक्ष 02 पनवेल यांच्या कडुन तपास करीत असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे स.पो.नि. प्रविण फडतरे, संदिप गायकवाड, पोलिस उप निरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील यांनी गुन्ह्यातील जखमी इसम, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळावरील प्राप्त सी.सी.टी.व्ही. फुटेज तसेच पो.ना. आजिनाथ फुदे, पो.शि. संजय पाटील, प्रविण भोपी यांनी केलेल्या तांत्रिक तपासाच्या आधारे अतिशय कौशल्यपुर्ण व सलग तपास करुन कोणतेही धागेदोरे नसताना गुन्ह्यात एकुण 6 आरोपींना निष्पण्ण केले. सदर गुन्हयातील 06 आरोपींना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे व कर्नाटक राज्य येथे जावुन अतिशय शिताफिने 72 तासांच्या आत गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल यांनी अटक केली. अशा प्रकारे सुरवातीस जबरी चोरी म्हणून दाखल झालेला गुन्हा दरोडा असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हयात भादविसं कलम 395, 397, 341, 120(ब) व आर्म अ‍ॅक्ट कलम 4, 25 अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये आरोपी अनिकेत जोमा म्हात्रे, वय 23 वर्षे, रा. ओवळेगाव, पो. पारगाव, ता. पनवेल जि. रायगड, कार्तिक सुशिल सिन्हा, वय- 24 वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. कल्पनानगर, पाषाण लिंक रोड, बानेर पुणे, किरण विजय पवार, वय- 21 वर्षे, धंदा- नोकरी, रा. घोटगाव, पो. कोयनावेळे, पनवेल, जि. रायगड, भिमा रामराव पवार, वय- 21 वर्षे, धंदा- नोकरी, रा. घोटगाव, पो. कोयनावेळे, ता. पनवेल, जि. रायगड, मनोज गुरम्या राठोड, वय-22 वर्षे, धंदा- मासेविक्री अशी नावे असून सदर आरोपींकडे केलेल्या चौकशीमध्ये नमुदचा गुन्हा हा अटक आरोपी व इतर 04 पाहिजे आरोपी यांनी टी पॉइंट चिंचपाडा येथील टेकडीवर कट रचुन केलेला आहे. नमुद आरोपिंनी फिर्यादी यांचा माग काढुन त्यांच्यावर घातक शस्त्राने हल्ला करुन सदरचा गुन्हा केलेला आहे. गुन्ह्यातील व्यापारी संतोष जाधव हे अंबेजोगाई बिड येथील सोन्याचे व्यापारी असुन अंबेजोगाई येथे प्रत्येक शनिवारी मार्केट बंद असल्याने ते शुक्रवारी रात्री सोने खरेदी करण्यासाठी अंबेजोगाई येथुन खाजगी ट्रॅव्हल्स बस ने मुंबई येथे येत असत. त्यावेळी फिर्यादी हे प्रत्येक शनिवारी कामोठे बस थांबा येथे उतरुन ते अटक आरोपी अनिकेत म्हात्रे याच्या परिचयाच्या व्यक्तिकडे फ्रेश होण्यासाठी जात असत. त्यांनतर ते सोने खरेदी करुन पुन्हा संध्याकाळी खाजगी ट्रॅव्हल्स बसने मुळगावी परत जात असत. सदरची माहीती अटक आरोपी अनिकेत म्हात्रे याने त्याच्या इतर साथिदारांना सांगितली. त्यानुसार त्यांनी हा कट रचल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *