तळोजात जीवघेणी बेकायदेशीर वाहन पार्किंग; प्रतिबंधात्मक पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशारा…

तळोजात जीवघेणी बेकायदेशीर वाहन पार्किंग; प्रतिबंधात्मक पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशारा

पनवेल दि.05 (वार्ताहर): तळोजा एमआयडीसीतील कारखान्यांसमोर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अवजड वाहने उभे केले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच त्याचबरोबर अपघाताला निमंत्रण दिले जाते. यामुळे महापालिकेच्या दोन स्वच्छताविषयक आणि सिडकोच्या एक बाग काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा अक्षरशा बळी गेला. यामुळे येथील  जीवघेणी बेकायदेशीर पार्किंग  चव्हाट्यावर आली आहे. यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा तोंडरे गावचे माजी सरपंच तथा  भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण तालुका उपाध्यक्ष राम महादु पाटील यांनी दिला आहे.

           तळोजा एमआयडीसी मध्ये अनेक कारखाने आहेत. त्यामध्ये रासायनिक इलेक्ट्रिकल, फिशर व इतर कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये माल उतरवण्यासाठी तसेच घेऊन जाण्याकरता मोठ्या संख्येने अवजड वाहने येतात. त्यात ट्रक कंटेनर आणि टँकरची संख्या जास्त असते. वास्तविक पाहता संबंधित कारखान्यांकडे पार्किंगची कोणतीच सोय नाही. त्याचबरोबर तळोजा एमआयडीसी कडूनही ट्रक टर्मिनस उभारण्यात आलेले  नाहीत. त्यामुळे येथे येणाऱ्या वाहने रस्त्यावर पार्किंग केले जातात. तळोजा एमआयडीसीतील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने बेकायदेशीरपणे उभे केले जातात. या कारणान वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. तसेच येथे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर लहान-मोठे अपघात दररोज घडतात. या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तसेच एमआयडीसीमध्ये अपघात प्रवण क्षेत्र निर्माण व्हावे वाहतूक कोंडी फुटावी  यासाठी या औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रक टर्मिनस उभारण्यात यावेत अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. सिडको मध्ये झालेल्या बैठकीत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यात आले होते. त्यानुसार लागली चार टर्मिनस सहा महिन्यात उभारण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना एमआयडीसीला देण्यात आल्या होत्या. त्याबाबत फारशा हालचाली सुरू झालेल्या दिसून येत नाहीत. दरम्यान तळोजा एमआयडीसीतील बेकायदेशीर पार्किंग मुळे पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता दूत शांताराम निरगुडा, काळूराम पारधी आणि सिडकोचे बाग कर्मचारी अनंता पारधी यांचा चार  दिवसांपूर्वी बळी गेला. कामावरून घरी जात असताना तळोजा एमआयडीसीत त्यांचे अपघाती निधन झाले. टँकरला धडक बसल्याने या तिघांवर मृत्यू ओढवला. यामुळे संबंधितांचे  कुटुंब अक्षरशा पोरके झाले आहेत. त्यांचा आधारच हरपला आहे. अशा प्रकारचे लहान-मोठे अपघात दररोज तळोजा एमआयडीसीतील बेकायदेशीर पार्किंगमुळे होतात. विशेष करून दीपक फर्टीलायझर, बॉम्बे बेवरेज,केलोग्स या कंपन्या समोर खुप अवजड  वाहने उभे राहतात. यामुळे अशा प्रकारचे अपघात घडत असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण तालुका उपाध्यक्ष राम पाटील यांनी व्यक्त केले आहे.

चौकट

 वाहतूक पोलिसांकडून बघ्याची भूमिका

तळोजा एमआयडीसीतील  रहदारीच्या रस्त्यांवर बेकायदेशीर पार्किंगचा अक्षरशा ऊत आला आहे. जिकडेतिकडे वाहनेच वाहने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात घडतात. चार दिवसांपूर्वी तीन जणांचा बळी या बेशिस्त पार्किंग आणि वाहनांमुळे गेला. या संदर्भात वाहतूक पोलिसांकडून ठोस अशी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडतात.

तळोजा एमआयडीसी चे ही दुर्लक्ष

एमआयडीसी मध्ये येणाऱ्या वाहनांना पार्किंग करिता जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी औद्योगिक विकास महामंडळाची आहे. अशाप्रकारे पार्किंग नसल्याने गाडी खाली करणे त्याचबरोबर भरेपर्यंत रस्त्यावर उभे राहावे लागते. परिणामी मोठ्या प्रमाणात वाहने दुतर्फा दिसून येतात. त्यातून अपघाताला निमंत्रण मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या डोके वर काढत असताना एमआयडीसीकडून ठोस अशा उपाययोजना केल्या जात नाहीत.

कोट

तळोजा एमआयडीसी मधील मोठ्या कंपन्या समोर 24 तास अवजड वाहनांचा ठिय्या दिसतो. तासन्तास ट्रक टँकर तेथे उभे केले जातात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. तसेच अपघाताला निमंत्रण मिळते. यामुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधित यंत्रणा असे किती जणांचे बळी घेणार आहे असा आमचा संतप्त सवाल आहे. याबाबत वेळीच उपाय योजना कराव्यात अशी आमची न्याय मागणी आहे. अन्यथा सर्वांना रस्त्यावर उतरून संबंधित विभागाला धडा शिकवावा लागेल याची नोंद घेण्यात यावी इतकीच माफक अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *