वीज वितरण कंपनीच्या खेळखंडोब्याच्या विरोधात शिवसेनेने उठवला आवाज.
नवीन पनवेल परिसरातील वीज वितरण कंपनीच्या खेळखंडोब्याच्या विरोधात शिवसेनेने उठवला आवाज
पनवेल दि.२३ (संजय कदम) : नवीन पनवेल परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून वीज वितरण कंपनीच्या मार्फत खेळखंडोबा सुरु असल्याने त्याच्या विरोधात नवीन पनवेल शिवसेनेने आवाज उठवला असून सध्याच्या गरमीच्या काहिलीमध्ये विजे शिवाय राहणे लोकांना मुश्किलीचे झाले आहे. तरी या संदर्भात वीज वितरण कंपनीने कायम स्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने केली आहे.
यावेळी नवीन पनवेल मधील सेक्टर ४, ८, ९, १०, ११ इत्यादी मधील वीज वितरण खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. अनेकदा दिवसातील आठ ते नऊ तास वीज गायब असते त्यातच सध्या उष्माच्या उच्चाकाने नागरिक अगोदरच त्रस्त झाले आहे. त्यातच वीज वितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. अनेक ठिकाणी त्यांचे वायर जोडणी-दुरुस्ती कामे सुरु असतात. त्यामुळे दोन-दोन महिने हि कामे सुरूच असतात त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना होत आहे. तरी या भोंगळ कारभारात सुधारणा करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडी नवीन पनवेल शहर संघटक अपूर्वा प्रभू यांनी अभियंता माने व कार्यकारी अभियंता बोके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देखमुख, विभाग प्रमुख किरण सोनावणे, विभाग संघटिका वैशाली थळी, वैशाली घाग, मालती पिंगळा, संजय डांबरे, प्रकाश विचारे, जनार्दन तांबोळी उपस्थित होते.