पनवेल महापालिका क्षेत्रात 12 – 14 वयोगटातील लसीकरणास सुरूवात.


पनवेल महापालिका क्षेत्रात 12 – 14 वयोगटातील लसीकरणास सुरूवात
उपजिल्हा रूग्णालयात 12 – 14 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन
पनवेल, दि.22 : राज्य शासनाच्या सूचनेनुसार 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणास पनवेल महापालिका क्षेत्रात आज(16 मार्च) सुरूवात झाली. आज उपजिल्हा रूग्णालयात महापौर कविता चौतमोल, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, महिला –बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेवक विक्रांत पाटील नगरसेविका सुरेखा मोहकर, सारिका भगत,प्रिती जॉर्ज –म्हात्रे, रूचिता लोंढे, वैद्यकिय अधिक्षक अधिकारी डॉ. सचिन संकपाळ, आरसीएच अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, वैद्यकिय अधिकारी मनिषा चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीमेने वेग घेतला असून आत्तापर्यंत 110 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. 12 -14 वयोगटातील लसीकरणासाठी 15 मार्च 2008 ते 15 मार्च 2010 या कालावधित जन्मलेली मुले पात्र असणार आहे. कोविडपासुन बचाव करण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपले लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
या लसीकरणासाठी कार्बेव्हॅक्स या लशींच्या मात्रा पालिकेस मिळाल्या असून, या लसीकरणासाठी शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्या पालिकेस देण्याचे आवाहन मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे. त्यानूसार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी विद्यार्थ्यांनी येताना आपले आधार कार्ड किंवा जन्मतारीख असलेले शाळेचे ओळखपत्र घेऊन येणे बंधनकारक आहे.
यावेळी महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी, परिचारिका, आशा वर्कर्स, शिक्षिका उपस्थित होत्या.
चौकट
16 मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महापालिका क्षेत्रात नुकताच राष्ट्रीय पल्स् पोलिओ कार्यक्रम 106 टक्के राबविण्यात आला. या अंतर्गत ज्या बुथवर जास्त् काम झाले अशा उत्तम कामगिरी बजावलेल्या आशा वर्कर्स, एनम यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.