रंगासह पिचकारी व फुग्यांच्या दरात झाली वाढ.

होळी सणानिमित्त नैसर्गिक रंगासह पिचकारी व फुग्यांच्या दरात झाली वाढ
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः होळी म्हटल्यावर सर्वात जास्त उत्साह बच्चे कंपनीला असतो. त्यातही या रंगांच्या उत्सवामध्ये पिचकारी खरेदी करण्यासाठी मुलांचा उत्साह असतो. मात्र, यावर्षी पिचकारीच्या दरात 20 टक्यांहुन अधिक तर रंगाच्या दरात 30 टक्यांहुन अधिक वाढ झाली आहे. यावर्षी भीम, स्पायडरमॅन पिचकारीकडे मुले आकर्षित होत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेली दोन वर्षे होळी, रंगपंचमी सणावर सावट होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे प्रमाण खूप कमी झाले असून शासनाने निर्बंध देखील हटविले आहेत. त्यामुळे यावर्षी होळीला पिचकारी खरेदीसाठी मुलांच्या उत्साहात वाढ होईल, असा अंदाज वर्तवून पिचकारी आणि रंगाच्या खरेदीस चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्‍वास दुकानदारांना वाटतो. पनवेल परिसरातील विविध दुकानांमध्ये प्राणी-पक्षांपासून ते कार्टुन्सच्या विविधरंगी पिचकार्‍यांनी बाजारपेठ भरली आहे. त्यात छोटा भीम, डोरेमॉन, स्पायडरमॅन, बॅटमन सगळ्यांचे प्रिय अँग्री बर्ड आहेत. या पिचकार्‍यांच्या किंमती पाचशे ते सातशे रुपयांच्या दरम्यान आहेत. तसेच रंग विव्रेत्यांनी विविध रंग छटा असलेले रंग बाजारात विक्रीसाठी ठेवले असून मागील वर्षी 50 ते 55 रुपये किलो दराने विक्री होत असलेल्या रंगाच्या दरात यावर्षी वाढ झाली असून ती 70 ते 80 रुपये किलो प्रमाणे विक्री केले जात आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे बाजारात देखील ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. गेले दोन वर्षे व्यवसाय ठप्प होता. मात्र, यावर्षी कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या संख्येत भर पडत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
कोट
कोरोनाचे प्रमाण कमी झाले असून शासनाने देखील निर्बंध हटविले आहे. त्यामुळे कोरोनाची भिती कमी झाली आहे. ग्राहकांच्या संख्येत वाढ होईल. यासाठी विविध प्रकारच्या पिचकारी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. किंमतीत देखील वीस टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दोन वर्षे व्यवसाय ठप्प होता. यावर्षी व्यवसाय पूर्वी प्रमाणे होईल, असे वाटते.
-यशवंत शेटे, दुकानदार, पनवेल.
फोटो ः रंग विक्री दुकान

Leave a Reply

Your email address will not be published.